६ फेब्रुवारी २०२०
सलग दोन दिवसाच्या इंधनाचे दर स्थिर ठेवल्यांनंतर गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे. गुरुवारी देशभरात पेट्रोल ८ ते १० पैसे आणि डिझेल १२ ते १३ पैशांनी स्वस्त झाले.
खनिज तेलाच्या किंमतींमधील घसरणीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन कपातीचा सपाटा कायम ठेवला आहे. बुधवारी मुंबईत पेट्रोलचा दर ७८.६९ रुपये होता. कपातीनंतर मुंबईत पेट्रोल ७८.५५ रुपयांपर्यंत खाली आले आहे. डिझेलचा दर ६९.०९ रुपये झाले असून त्यात १३ पैशांची घट झाली.
नवी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७२.८९ रुपये मोजावे लागत असून डिझेलचा दर ६५.९२ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ७५. ५७ रुपये आणि डिझेल ६८.२९ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोल दर ७५.७३ रुपये आणि डिझेल ६९.६३ रुपये आहे. गुडगावमध्ये पेट्रोल ७२.८२ रुपये असून डिझेल ६५.१० रुपये आहे. कंपन्यांच्या दर कपातीने १२ जानेवारीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. १२ जानेवारीपासून कंपन्यांकडून दर कपात करण्यात आल्याने पेट्रोल ३ रुपये ०५ पैसे आणि डिझेल ३ रुपये २० पैशांनी स्वस्त झाले आहे.