६ नोव्हेंबर
पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु. ल. परिवार, आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्यातर्फे शुक्रवारपासून (८ नोव्हेंबर) चार दिवसांच्या ‘ग्लोबल पुलोत्सवा’चा समारोप आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना पु. ल. स्मृती सन्मान जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुलोत्सव जीवनगौरव, शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यां-लेखिका रेणू दांडेकर यांना पुलोत्सव कृतज्ञता सन्मान, अभिनेते शरद पोंक्षे यांना विशेष सन्मान तर अभिनेते-लेखक चिन्मय मांडलेकर यांना तरुणाई सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुलोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव आणि व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ यांच्याशी सुधीर गाडगीळ संवाद साधणार आहेत. तर शरद पोंक्षे अभिवाचन आविष्कार सादर करणार आहेत, अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी सोमवारी दिली. पुलोत्सवातील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत.
‘ग्लोबल पुलोत्सवा’तील कार्यक्रम
*शुक्रवार (८ नोव्हेंबर) रात्री ९
‘पु. ल. : एक संचित’ दृक-श्राव्य अभिवाचन कार्यक्रम
सहभाग : सुप्रिया चित्राव, गिरीश कुलकर्णी, शरद पोंक्षे
* शनिवार (९ नोव्हेंबर) रात्री ९
‘भा. डि. पा. चे वल्ली’
सादरकर्ते : सावनी वझे, मंदार भिडे, चेतन मुळे, ओंकार रेगे, पुष्कर बेंद्रे, सारंग साठय़े
* रविवार (१० नोव्हेंबर) रात्री ९
‘पुलकित गाणी’
सादरकर्ते : शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार, ऋषिकेश बडवे
* सोमवार (११ नोव्हेंबर) रात्री ९
‘आमचे पी. एल.’
सादरकर्ते : वंदना खांडेकर, अंबरीश मिश्र