१२ फेब्रवारी २०२०,
सेनापती बापट रस्त्यावरील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये तरुणीचा दोन बाऊन्सरनं विनयंभग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याऐवजी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला. त्याला चतुःश्रुंगी पोलिसांनी देखील साथ दिली. पण, तरुणीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत २२ वर्षीय तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी बाऊन्सरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी व तिचा मित्र हे २६ जानेवारी रोजी सेनापती बापट रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये गेले होते. या ठिकाणी नृत्य करत असताना तरुणीच्या पोटात दुखत असल्यामुळे ती टेबलावर बसली होती. त्यावेळी दोन बाऊन्सर त्या ठिकाणी आले. त्यांनी तरुणीचा विनयभंग केला. त्यावेळी तरुणीच्या मित्राने विरोध केला. त्याला बाऊन्सरनं शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकारानंतर दोघांना हॉटेलच्या बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी तरुणीने चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यावेळी हॉटेलच्या व्यवस्थापनाकडून प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले गेले. तसेच, चतुःश्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांना साथ दिली. तसेच, तरुणीला पैसे देऊन प्रकरण मिटविण्यावर चर्चा केली. हा प्रकार रेकॉर्ड करून त्यांनाच खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्यांना साथ दिल्यामुळे त्यावेळी प्रकरण मिटले. पण, तरुणीने हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.