४ नोव्हेंबर
पुणे शहर आणि परिसरामध्ये रविवारी संध्याकाळी सातनंतर तासभर झालेल्या मुसळधार पावसाने विविध रस्त्यांवर पुन्हा मोठय़ा प्रमाणावर पाणी जमा झाले होते. संध्याकाळी बाहेर पडलेल्या नागरिकांची या पावसाने तारांबळ उडवून दिली. संध्याकाळी साडेआठपर्यंत ५२. ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. शहर आणि परिसरामध्ये ७ नोव्हेंबपर्यंत पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे.
नैर्ऋत्य मोसमी पावसाचा हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने नागरिकांची दैना उडवून दिली. पुण्यात यंदा पावसाने विक्रम केला. मात्र, हा पाऊस विक्रमानंतर वैतागाच्या दिशेने गेला. अरबी समुद्रात कयार चक्रीवादळ निर्माण झाल्यापासून शहरात पुन्हा पावसाची हजेरी आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच महा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. सध्या त्याची तीव्रता वाढते आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी आहे.
चक्रीवादळामुळे निर्माण झालेली स्थिती आणि स्थानिक वातावरणामुळे रविवारी पुणे शहरात संध्याकाळी सातनंतर एक तास मुसळधार पाऊस पडला. पंधरा ते वीस मिनिटांतच रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर पाणी जमा झाले. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर रहदारी असल्याच्या वेळेतच हा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडण्याचे प्रकार झाले. रस्त्यावरून पाण्याचा वेळेत निचरा होत नसल्याचे या पावसाने पुन्हा स्पष्ट झाले आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार ४ नोव्हेंबरला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
पुणे शहर आणी परिसरांत पुन्हा जोरदार पाऊस
RELATED ARTICLES