८ नोव्हेंबर
हृदयक्रिया बंद पडल्यानंतर व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार करण्यासाठी आवश्यक सीपीआर (प्राथमिक जीवनदायी तंत्र) कीट खरेदीला पालिकेच्या स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिली. त्यानुसार, महापालिका ७८८ सीपीआर कीट खरेदी करणार असून, त्यामध्ये ३१५ बेसिक मॅनेकिन आणि ४७३ अॅडव्हान्स मॅनेकिन कीटचा समावेश आहे.
पालिकेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना या तंत्राचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आणि आरोग्य विभागप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, विजेचा धक्का, पाण्यात बुडणे, रस्त्यावर अपघात अशा विविध कारणांमुळे व्यक्तीची हृदयक्रिया अचानक बंद पडते. पैकी साठ टक्के जणांचा रुग्णालयीन उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू होतो.
मात्र,संबंधितांना ‘सीपीआर’ तंत्राने उपचार दिल्यास त्यांचा जीव वाचू शकतो. त्यासाठी उपयुक्त कीट खरेदी करण्यासाठी महापालिकेने अंदाजपत्रकात तरतूद केली होती. त्यानुसार, निविदा मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान, या कीटचे उत्पादक पुढील वर्षभर पालिकेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना ‘सीपीआर’चे प्रशिक्षण देणार आहेत.
पुणे महापालिकेने दिली ‘सीपीआर कीट’ खरेदीला मान्यता
RELATED ARTICLES