२७ नोव्हेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शहरातील नागरिकांच्या कामाचा कंटाळा आल्याचे दिसते. गेल्या अनेक दिवसांपासून ते वरीष्ठ स्तरावरील अधिका-यांच्या, नेत्यांच्या भेटी गाठी घेत असल्याची माहिती समजते. राज्यातील फडणवीस सरकार 80 तासात कोसळल्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी मागे लागायला नको, या भीतीपोटी त्यांची बदली करून घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आयुक्त हर्डीकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी मानले जातात. राज्यात भाजपची सत्ता येताच स्वतः फडणवीसांनी त्यांची याठिकाणी नियुक्ती करून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चाव्या स्वतःकडे ठेवल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटी सारखी महागडी योजना राबविण्यात येत आहे. आता फडणवीस यांनी दोनच दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने आयुक्तांची खुर्ची डळमळीत झाली आहे.
राज्यात सरकार स्थापन होताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लवकरच पुण्याच्या पालकमंत्री पदावर नेमणूक होण्याची शक्यता आहे. पवार पालकमंत्री झाल्यानंतर हर्डीकरांना स्मार्ट सिटी योजनेतील कामांची चौकशी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हाकनाक बळी जाण्याची शक्यता मनात घेऊन आयुक्त स्वतः बदली करून घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसते. त्यासाठी त्यांनी वरीष्ठ स्तरावरील अधिकारी, नेते मंडळींच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केल्याची कुणकुण लागली आहे.