१४ नोव्हेंबर,
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत पुणे मेट्रोचे काम संथ गतीने सुरू आहे. कामाची प्रगती पाहता पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये मेट्रो धावणार नाही, हे स्पष्ट होत आहे. या संथ गती कामामुळे वाहतुक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह पादचारी वैतागले आहेत.
शहरात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडीच्या हॅरिस पुल ते चिंचवड मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, संत तुकारामनगर, नाशिक फाटा चौक, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी हे 6 मेट्रो स्टेशन आहेत. त्यापैकी केवळ संत तुकाराम नगर आणि फुगेवाडी स्टेशनचे काम वेगात सुरू असल्याचे चित्र असून, ते पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. उर्वरित 4 स्टेशनची कामे 2020 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. या 7 किलोमीटर अंतराच्या मार्गावर सर्व एकूण 283 पिलरच्या फाउंडेशनचे (पाया) काम पूर्ण झाले आहे. अजूनपर्यंत सुमारे 10 पिलर तयार होणे बाकी आहे. त्यापैकी 197 पिलर कॅप तयार झाले आहेत. अद्याप 86 पिलर कॅप होणे शिल्लक आहे.
एकूण 165 स्पॅनचा सुमारे 5 किलोमीटर अंतराचा व्हाया डॅक्ट तयार झाला आहे. उर्वरित 2 किलोमीटर अंतराचा स्पॅनची जुळवणीचे काम अपूर्ण आहे. मार्गावरील खराळवाडी येथे बसविलेले पाचवे गर्डर लॉर्चर मशिनने चिंचवडच्या दिशेने जुळवणीचे काम सुरू आहे. ते काम पिंपरी चौकापर्यंत आले आहे. अद्याप पिंपरी चौक ते एम्पायर पुल, शंकरवाडी ते कासारवाडी, दापोडी ते हॅरिस पुल या ठिकाणी स्पॅनची जुळवणी झालेली नाही. नाशिक फाटा चौकातून उड्डाणपुलावरील सर्वांत उंच मार्गिकेचे काम महामेट्रोसाठी किचकट ठरणार आहे. या मार्गावरील 7 पैकी 3 किलोमीटर अंतरावराच्या दुहेरी रूळाचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 4 किलोमीटर अंतर रूळ टाकण्याचे काम अपूर्ण आहे. मेट्रो संचलनासाठी मार्गावर ‘ओव्हर हेड इलेक्ट्रीक वायर पोल’ (विद्युत वाहिन्यांचे खांब) उभारणीचे काम सुरू आहे. मात्र, त्याचा वेग दिसत नाही.
रेंजहिल्स मेट्रो डेपोऐवजी तात्पुरत्या स्वरूपात मदर टेरेसा उड्डाणपुल येथे उभारण्यात येणार्या डेपोचे काम अद्याप सुरू झालेले नाही. काम झाल्यानंतर दुभाजक पुर्ववत करण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह पादचारी वैगातले आहेत.
मेट्रोने निश्चित केलेल्या दापोडी ते पिंपरी या 7 किलोमीटर अंतराच्या प्राधान्यक्रम मार्ग डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहेत. सध्या सुरू असलेले कामे ही अवजड व तांत्रिक दृष्ट्या किचकट आहेत. सुरक्षेला प्राधान्य देऊन वेगात काम केले जात असल्याचा दावा, महामेट्रोच्या अधिकार्यांनी केला आहे.