१४ मार्च २०२०,
पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला चिखली मध्यवर्ती सुविधा केंद्रातील व्यापारी भूखंड विक्रीतून एकूण सुमारे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. त्यातील एक भूखंड ‘ लीझ डीड ‘ तत्त्वावर देण्याचे निश्चित झाले आहे. संबंधित भूखंडाच्या अधिमूल्यापोटी प्राधिकरणाला ४. ७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे, अशी माहिती उप – मख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.
प्राधिकरणाकडून चिखली मध्यवर्ती सुविधा केंद्रातील एकूण ६ भूखंड लीझ डीड तत्त्वावर दिले जाणार आहेत. त्यातील एका भूखंडाच्या ‘ लीझ डीड ‘ साठी प्रतिसाद मिळाला आहे. संबंधित भूखंडासाठी प्राधिकरणाने मूळ अधिमूल्य रक्कम ३. ९१ कोटी रुपये इतकी निश्चित केली होती. मात्र, या भूखंडाला त्यापेक्षा जादा अधिमूल्य रक्कम देण्याची तयारी भूखंड खरेदीसाठी निविदा भरणाऱ्या व्यापाऱ्यांनी दर्शविली. त्यामुळे या भूखंडाला ४. ७८ कोटी इतकी अधिमूल्य रक्कम मिळणार आहे. त्यासाठी प्राधिकरण सभेची मंजुरी घेतली जाणार आहे.
चिखली मध्यवर्ती सुविधा केंद्रातील ‘ लीझ डीड ‘ तत्त्वावर देण्यात येणाऱ्या भूखंडांचे कमीत कमी क्षेत्र हे ११०० चौरस मीटर तर जास्तीत जास्त क्षेत्र हे १४०० चौरस मीटर इतके असणार आहे. उर्वरित पाच भूखंड ‘ लीझ डीड ‘ तत्त्वावर वितरित करण्यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहे.