Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीपाणी कपात करणा-या पदाधिका-यांच्या मानधनात व अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपात करा...

पाणी कपात करणा-या पदाधिका-यांच्या मानधनात व अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपात करा : सचिन साठे

२६ नोव्हेंबर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील २५ लाखाहून जास्त लोकसंख्येला काल सोमवारपासून (दि. 25) दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला . हा निर्णय घेणा-या महापालिकेच्या सर्व पदाधिका-यांच्या मानधनात व अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपात करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देऊन केली आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ही वेतनकपात लागू ठेवावी अन्यथा रविवारी (दि. 1 डिसेंबर) पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा सचिन साठे यांनी पत्रात दिला आहे.

सचिन साठे यांनी शहर कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळासमवेत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना पत्र दिले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नेते मेहताब इनामदार, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, मोहन अडसूळ, कुंदन कसबे, व्ही.एस.कबीर, विठ्ठल कळसे आदी उपस्थित होते.

साठे यांनी पत्रात पुढे म्हटले की, वस्तुत: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी सरासरीपेक्षा 127 टक्क्यांहून जास्त पाऊस पवना धरण परिसरात झाला आहे. धरणात मागील वर्षीपेक्षा जास्त जलसाठा आजही आहे. चालू वर्षी जास्त झालेल्या पावसामुळे धरणक्षमतेच्या चौपट पाणी नदीव्दारे विसर्ग करून सोडण्यात आले. पुढील वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असतानाही निव्वळ आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना अपु-या पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आयुक्तांचे नियोजन म्हणजे त्यांच्या अपयशाची व अकार्यक्षमतेची कबुलीच आहे. प्रशासनावर अंकुश नसलेल्या आयुक्तांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकाव्दारे केली होती. तसेच मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी शहर कॉंग्रेसच्यावतीने वेळोवेळी आंदोलने, मोर्चा काढण्यात आले होते. मागील सार्वत्रिक निवडणुकीत शहरभर चोवीस तास पुरेशा दाबाने आणि शहराला बंद जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा करू असे आश्वासन भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते.

आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. सत्ताधा-यांचे आयुक्तांवर नियंत्रण नाही आणि आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नाही. त्यांची निष्क्रीयता वेळोवेळी सिद्ध झाली आहे. पाणीगळती व पाणीचोरी रोखण्यास मनपा प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. शहरातील नागरिक वेळोवेळी पाणीपट्टीसह सर्व कर महापालिकेच्या तिजोरीत भरतात. त्यातुनच महापालिकेच्या सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन दिले जाते. करदात्या नागरिकांना प्राथमिक सेवा, सुविधा देणे ही महापालिका प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणा-या आणि निष्क़्रीय प्रशासनाला पाठीशी घालून शहरातील 25 लाख लोकसंख्येला वेठीस धरणा-या सर्व पदाधिका-यांचे मानधन तसेच अधिकारी व कर्मचा-यांचे वेतनात 50 टक्के कपात करावी. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ही वेतनकपात लागू ठेवावी अन्यथा रविवारी (दि. 1 डिसेंबर) पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करू. यानंतर उद्‌भवणा-या परिस्थितीस महापालिकेचे लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार राहिल, असे हि साठे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments