४ नोव्हेंबर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना नाहक पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन कामकाजाचे नियोजन कोलमडले आहे. विशेषतः महिला भगिनींना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. लहान, मोठ्या सर्व सोसायट्यांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला १०० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. जुलै २०२० पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. त्यामुळे विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा रद्द करण्यात यावा, या मागणीकरीता पिंपरी चिंचवड शहर मनसे अध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर व मावळ मधील नागरिकांची तहान भागविणारे पवना धरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील १०० टक्के भरले आहे. मागील वर्षी आजमितीला धरणात ८८ टक्के पाणीसाठी होता. मागील वेळेपेक्षा यावेळी धरणात ११.५० टक्के पाणीसाठा अधिक आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांना अजून देखील पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शहरातील काही ठिकाणी पाण्याच्या बाबत बोंबाबोंब सुरू आहे. नागरिकांची नैराश्याची भावना आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे, तर काही ठिकाणी पाण्याचे टँकर अद्याप देखील सुरू आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून त्वरित शहरावरील पाणीकपात रद्द करून शहरवासीयांना सुरळीत, नियोजित व मुबलक पाणीपुरवठा करावा, असे या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी शहर मनसेचे रुपेश पटेकर, सिमाताई बेलापुरकर, रवी जाधव, स्वप्निल महांगरे, मनोज लांडगे, रोहित काळभोर, प्रतिक शिंदे, गणेश उज्जेन्नकर आदी उपस्थित होते.