२४ नोव्हेंबर,
महाराष्ट्रात घडलेल्या या मोठया राजकीय घडामोडीनंतर केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेच भारतीय राजकारणाचे चाणक्य असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
या 12 तासांत असं काय घडलं की राज्याचं राजकारण पूर्ण बदललं.. कर्नाटकात जसं भाजपने बहुमत नसतानाही दुसऱ्या पक्षाचे आमदार वळवले होते.. तसंच काहीसं महाराष्ट्रात घडलं का? कसं झालं महाराष्ट्राचं ऑपरेशन लोटस?
त्या रात्री काय घडलं?
राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची सत्ता स्थापनेसाठी दररोज चर्चा सुरु होत्या. नेमकं त्यातून काही निष्पन्न होताना दिसत नव्हतं. मीडियाचं संपूर्ण लक्ष या तिन्ही पक्षांकडे केंद्रीत झालेलं असताना भाजपामध्ये पूर्णपणे शांतता दिसत होती.
खरतंर ती वादळापूर्वीची शांतता होती. पडद्यामागे बरच काही घडतं होतं.शुक्रवारी रात्री ७ वाजता जेव्हा बैठकीतून बाहेर येऊन शरद पवार यांनी सांगितले की उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील त्याच रात्री अमित शहा यांनी त्यांचे निकटवर्तीय, विश्वासू सहकारी भूपेंद्र यादव यांना गुपचूपपणे मुंबईत पाठवलं.
मध्यरात्रीच्या सुमारास भूपेंद्र यादव , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये सत्ता स्थापनेसंबंधी एकमत झालं. काही मिनिटात अमित शाह यांना फोन करुन दोन्ही नेत्यांमध्ये काय ठरलं त्याची माहिती देण्यात आली.
रात्री २ वाजता देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव आणि अजित पवार यांच्यात मुंबईमध्ये चर्चा सुरु होत्या. त्याचवेळी दिल्लीत अमित शाह जागे होते. महाराष्ट्रात सरकार स्थापनेपूर्वी घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर त्यांचे अत्यंत बारीक लक्ष होते.
रात्रीच महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिवांना राष्ट्रपती राजवट हटवण्यासंबंधी पावले उचलण्यास सांगण्यात आले.मध्यरात्री 12 वाजता स्वत: अजित पवार राज्यपालांकडे गेले आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असणारं पत्र दिलं, असं एबीपी माझा वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत असल्याचं लक्षात येताच राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी रातोरात राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस करणारं पत्र दिल्लीत धाडलं. राष्ट्रपतींनी कलम 356 (2) अन्वये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पहाटे पावणे 6 वाजता महाराष्ट्रातील 12 दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रपती राजवट हटवण्याची परवानगी दिली. त्यामुळे नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाला सकाळी ६.३० वाजताच देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा कार्यक्रम करायचा होता. पण सकाळीच शपथविधी शक्य असल्याचे भाजपा नेतृत्वाला कळवण्यात आले.
तास-दीड तास थांबावे लागेल हे भाजपाला सांगण्यात आले.
सकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्यानंतर सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.