१९ मार्च २०२०,
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना उद्या २० मार्चला होणाऱ्या फाशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पतियाळा होऊस कोर्टाने चारही दोषींची फाशीची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला आहे. फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या दोषींच्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. शेवटी ७ वर्षे, ३ महिने आणि ३ दिवसांनंतर निर्भयाच्या गुन्हेगारांना आता फाशी होणार आहे. मात्र, दोषींनी शेवटपर्यंत फाशी टाळण्याचे कसे प्रयत्न केले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरू असताना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कोर्टरूममध्ये दोषी अक्षय कुमार याती पत्नी न्यायाधीशांसमोर रडू लागली. अक्षयकुमारच्या पत्नीने निर्भयाची आई आशादेवी यांचे पाय पकडून आपल्या नवऱ्याची फाशी रोखा अशी विनंती केली.
दोषी मुकेश, पवन, अक्षय आणि विनय यांच्याकडे कोणतीही लाइफलाइन शिल्लक नव्हती. म्हणजेच त्यांच्याकडील सर्वच कायदेशीर मार्ग संपलेले होते. त्यानंतर देखील अक्षयच्या वतीने त्याचे वकील ए. पी. सिंह यांनी राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळून लावण्याला गुरुवारी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. अक्षयची दया याचिका फेटाळून लावण्यात आल्याने अक्षयशी संबंधित सर्वच लोकांवर त्याचा परिणाम होणार आहे, असे सिंह म्हणाले. कोर्टाने मात्र सिंह यांचे म्हणणे फेटाळून लावले. एक दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर दुसरी याचिकाही राष्ट्रपतींनी फेटाळल्याचे कोर्टाने सिंह यांना सांगितले. आता याचा न्यायालयीन समीक्षा होऊ शकणार नाही, असे कोर्ट म्हणाले.
तर, दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने निर्भया प्रकरणातील दोषी अक्षय सिंह यांची याचिकाही फेटाळून लावली आहे. राष्ट्रपतींनी अक्षय कुमार यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर त्याने त्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पोलिसांनी अक्षयचा मानसिक आणि शारीरिक छळ केला असे वकील ए. पी. सिंह यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले होते. पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केल्याचेही त्यांनी सांगितले. निर्भया प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा मिळालेले सर्व दोषी ही तरुण आहेत म्हणून त्यांना दया दाखवली पाहिजे असे न्यायमूर्ती कुरियन यांनीही म्हटले होते असे सिंह यांनी कोर्टाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.
चार दोषींपैकी एका दोषीची एक दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित असल्यामुळे ही फाशी रद्द करावी अशी दोषींकडून कोर्टात मागणी करण्यात आली. मात्र, ही दुसरी दया याचिकाही फेटाळण्यात आल्याची माहिती सरकारी वकीलांनी कोर्टाला सांगितले. त्यानंतर ही फाशी रद्द करण्याला पतियाळा हाऊस कोर्टाने नकार देत फाशी कायम राखली.