२ मार्च २०२०
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी पवन कुमारची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता चारही आरोपींचा फाशीचा मार्ग मोकळा असून ३ मार्च २०२० ला या चारही जणांना फाशी देण्यासंबंधीचं डेथ वॉरंट याआधीच जारी करण्यात आलं आहे. आता पवनने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. खरंतर या चारही आरोपींपुढचे सगळे कायदेशीर पर्याय संपल्यात जमा होते. तरीही पवन आणि अक्षय या दोघांनी अनुक्रमे शुक्रवारी आणि शनिवारी याचिका दाखल केली होती. त्यातील पवनची याचिका फेटाळण्यात आली आहे.
निर्भया बलात्कार याप्रकरणी सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात २०१३ मध्ये आत्महत्या केली. ऑगस्ट २०१३ मध्ये अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. सप्टेंबर २०१३ मध्ये चार मुख्य आरोपींना १३ अपराधांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाने दोषी ठरवलं. १३ सप्टेंबर २०१३ रोजी या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर १३ मार्च २०१४ रोजी फाशीच्या शिक्षेविरोधात आरोपींनी केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायलयात सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयानेही या चारही दोषींची फाशी कायम ठेवली. त्यानंतर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टातही या चारही जणांची फाशी कायम ठेवण्यात आली.