एका अंतराळवीरानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून जोडीदाराच्या बँक खात्याचा गैरवापर केला, या आरोपाची चौकशी नासा करत आहे. जर हे आरोप सिद्ध झाले तर हा अंतराळात घडलेला पहिलाच गुन्हा ठरू शकतो.
अंतराळवीर अॅन मकलेन यांनी मान्य केलंय की त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात प्रवेश केला, पण त्याचा कुठलाही गैरवापर आपण केला नाही, असं त्यांनी म्हटल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे.
अॅन यांच्या जोडीदार समर वॉर्डन यांनी फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मकलेन अंतराळातून परतल्या होत्या.
त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला वकिलामार्फत सांगितलं की त्या फक्त याची खात्री करत होत्या की घर चालवण्यासाठी पुरेसे पैसै उपलब्ध आहेत की नाही, घरातील बिलं भरण्यासाठी वगैरे. तसंच वेगळे झाल्यानंतर त्यांच्या मुलाच्या संगोपनाची पुरेशी व्यवस्था आहे की नाही, याचीही सुनिश्चिती त्या करत होत्या.
त्यांनी चुकीचं काहीच केलं नाही आणि त्या तपासात पूर्णपणे सहकार्य करत आहेत, असं त्यांचे वकील रस्टी हार्डिन यांनी सांगितलं.