१२ फेब्रुवारी २०२०
देशातील पहिले वृक्ष संमेलन दि.१३,१४ फेब्रुवारी रोजी बीडमध्ये भरणार आहे. देशातील हे पहिलेच अशा प्रकारचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. झाडं नुसती लावणं महत्त्वाचं नाही. ती जगवलीही गेली पाहिजेत. मी स्टेटस घेऊन आलेलो नाही तर झाडांचे गुण घेऊन आलो आहे. म्हणून ‘झाडाचे गुण घेऊ आणि गाऊ’ हाच संदेश आम्ही वृक्ष संमेलनातून देत आहोत. बीड जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असून झाडे वाढली पाहिजेत.
पर्यावरण सांभाळले पाहिजे. म्हणून झाडे लावा व ती जगवा अशी ही चळवळ आहे. त्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे अभिनेता सयाजी शिंदे यांनी सांगितले. एका वडाच्या झाडाला अध्यक्ष बनवले आहे. शिंदे पुढे म्हणाले की, बीडमध्ये २०१७ पासून आम्ही झाडे लावायला सुरुवात केली होती. बीडच्या सह्याद्री देवराईत आम्ही सलग तीन वर्षे झाडांचे वाढदिवस साजरे केले. तिथूनच आम्हाला वृक्ष संमेलनाची संकल्पना
सुचली. बीड तालुक्यातील पालवनच्या उजाड माळरानावर फुललेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर जगातील पहिले वृक्ष संमेलन येत्या १३ व १४ फेब्रुवारीला होत आहे. वन विभाग व महसूल विभाग आम्हाला मदत करत आहे. यंदा बीड जिल्ह्यात वृक्ष संमेलन होत असून पुढील वर्षी दुसर्या जिल्ह्यात असे संमेलन घेतले जाणार आहे. संमेलन घेणं अवघड नाही, पण त्या संमेलनांना अर्थ असायला हवा. त्यातून काहीतरी फलनिष्पत्ती व्हावी.
हाच या वृक्ष संमेलन घेण्यामागे आमचा उद्देश आहे. अशा प्रकारचे संमेलन पहिल्यांदाच होत असल्याने त्याच्या अध्यक्षपदी नेमके कोण असावे असा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला होता. जर हे संमेलन वृक्षांचेच असेल तर एखादे झाडंच जर अध्यक्ष असेल तर ही संकल्पना सुचली आणि आम्ही एका वडाच्या झाडाला अध्यक्ष बनवले आहे. बीडच्या वृक्ष संमेलनात वडाचे झाड संमेलन अध्यक्ष आहे. कारण रस्ते रुंदीकरणाच्या कामात मोठमोठी वडाची झाडे तोडली गेली. खूप नुकसान झाले आहे. आपल्याला लाज वाटली पाहिजे, जगण्यासाठी तरी एक तरी झाड लावलेच पाहिजे. म्हणून या संमेलनात राज्यातून वृक्षप्रेमी येत आहेत.