दानवेंविरोधात गुरुवारी पुण्यात आंदोलन
पिंपरी (6 नोव्हेंबर 2019) : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्यांबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
बुधवारी (दि. 6 नोव्हेंबर) पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एकबोटे बोलत होते. यावेळी राजे शिवराय प्रतिष्ठानचे शिवाजी खरात, विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्ष विभागाचे शिवांकुर खेर, विश्व हिंदू परिषदेचे मावळ तालुका संयोजक योगेश शेटे, मानद पशु कल्याण अधिकारी गोरक्षण विभागाचे शिवशंकर स्वामी आदी उपस्थित होते.
यावेळी एकबोटे म्हणाले की, गोहत्येला प्रोत्साहन देणारे वक्तव्य दानवेंसारख्या जबाबदार व्यक्तीने करणे योग्य नाही. त्यांच्या या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. याबाबत दानवेंचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. 7 नोव्हेंबर) दुपारी 4 वाजता जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. आमचे हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती व पक्षाच्या विरोधात नसून प्रवृत्ती व विचारांच्या विरोधात आहे. दानवेंचे हे वक्तव्य गोहत्येला तिलांजली देणारे असून मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारे आहे, असेही एकबोटे म्हणाले.
गोमाता म्हणजे अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम आहे. देशहिताच्या दृष्टीकोनातून कृषीलक्ष्मी गायींची काळजी प्रत्येक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. गायींकडे दुर्लक्ष करून विकास म्हणजे विनाशाला निमंत्रण ठरेल. महात्मा गांधी, महात्मा फुले, आचार्य विनोबा भावे या थोर पुरुषांनी देखील गोरक्षणाची कल्पना मांडलेली आहे. भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील घटनेत कलम 48 मध्ये नमूद केले आहे की, भाकड जनावरे कापली जाऊ नयेत म्हणून स्थानिक राज्य सरकारांनी योग्य ते कायदे करावेत. मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयाचा अहवाल सांगतो की, कोल्हापूरातील कागल व शिरोळ तालुक्यात गायींची संख्या कमी झाल्यामुळे शेणखत उपलब्ध होत नाही. त्यामुळे तेथील शेतकरी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करू लागले तेथील हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. त्यानंतर या दोन तालुक्यात कॅन्सरच्या रुग्णात लक्षणीय वाढ झाली. शेती व शेती उत्पादनात वाढलेल्या रासायनिक खतांच्या वापरामुळे पवित्र पंचगंगेचे पाणीदेखील प्रदूषित झाले आहे. कृषी प्रधान भारत देशात वाढणा-या लोखसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी गो-गोवंश हत्या बंद करणे व गोरक्षण करणे आवश्यक असल्याचेही मिलिंद एकबोटे यांनी यावेळी सांगितले.
दानवे यांनी गोहत्यांबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे : मिलिंद एकबोटे
RELATED ARTICLES