१३ डिसेंबर
पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा आजाराने एकाच महिन्यात दोन सख्खा भावंडाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उजेर हमीद मणियार (वय-४ वर्षे ) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव असून आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. तर, या अगोदर नोव्हेंबर महिन्यात त्याचा सख्खा लहान भाऊ अदनान हमीद मणियार (वय-९,महिने) याचा देखील डेंग्यूने मृत्यू झाला होता.
पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे मणियार कुटुंब राहत असून हमीद व रिजवाना मणियार दांम्पत्याच्या तीन मुलांपैकी दोन मुलांचा अवघ्या महिनाभरात डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून प्रचंड ताप असल्याने उजेर याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे महिनाभरापूर्वीच या कुटुंबातील सर्वात लहान असलेल्या मुलाचा डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुळे मणियार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, थेरगाव येथील पडवळनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी जुने पिण्याच्या पाण्याचे पाईप काढून, नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. परंतु, जुने पाईप मात्र तसेच ठेवण्यात आल्याने पाण्याचे डबके साचून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याची तक्रार नागरिकांची आहे. शिवाय अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पानी रस्त्यांवर आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डेंग्यू आजाराची लागण होऊन नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.