३० सप्टेंबर २०२०,
हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. घटनेतील पीडितेचा दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, पोलिसांनी कुटुंबीयांकडून पीडितेचं पार्थिक घेत घाईनं अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. प्रियंका गांधी यांनी हाथरस घटनेसंदर्भात काही प्रश्न योगींना विचारले आहेत.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये देशाला हादरवून टाकणारी घटना घडली. १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी १९ वर्षीय दलित तरुणी आपल्या शेतात गेली होती. या ठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली, तेव्हा तिची जीभ कापलेली होती. तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झालेली होती. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूनंतर तिच्यावर तातडीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावरून प्रियंका गांधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते… कुटुंबीयांकडून जबरदस्तीनं हिसकावून घेत पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश कुणी दिला? मागील १४ दिवसांपासून तुम्ही कुठे झोपलेला होतात? तातडीनं कार्यवाही का केली नाही? कधीपर्यंत हेच चालत राहणार आहे? तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?,” असे प्रश्न विचारत प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यानाथ यांना धारेवर धरलं आहे.