२९ नोव्हेंबर
टाटा मोटर्स या देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील वाहनांच्या खपात घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सने व्हीआरएस योजना आणली आहे. या योजनेनुसार टाटा मोटर्स विविध विभागांतील 1,600 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देणार आहे. व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहन व्यवसाय दोन्ही प्रकारच्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असणार आहे.
‘या वर्षी टाटा मोटर्स याआधीच्या तुलनेत अधिक गांभीर्याने कर्मचारी कपात करण्याच्या विचारात आहे. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये जॅग्वार लॅंड रोवरमधील अतिरिक्त स्टाफ कमी केल्यानंतर आता कंपनी विविध प्रकल्पांमधील आणि विविध पदांवरील 1,600 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देणार आहे’, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एप्रिल 2020 पासून वाहनांच्या प्रदूषणासंदर्भातील कडक नियमांची अंमलबजावणी होणार असल्याचा मोठा परिणाम टाटा मोटर्स या देशातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या कंपनीवर होणार आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील इतर अनेक कंपन्यांनी याआधी स्वेच्छानिवृत्ती योजना कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. यावर्षी आतापर्यत हिरो मोटोकॉर्प लि., टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि. आणि अशोक लेलॅंड लि. यांनी या प्रकारच्या योजना आणल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून टाटा मोटर्स आपल्या कर्मचाऱ्यांवरील खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करते आहे. याआधी कंपनीने 2017 मध्येही अशीच योजना आणली होती. मात्र, त्यावेळेस टाटा मोटर्सच्या अनेक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजना न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. टाटा मोटर्सने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 1,281.97 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 109.14 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचा महसूलही 44 टक्क्यांनी घटून 17,758.69 कोटी रुपयांवरून 10,000 कोटी रुपयांवर आला आहे.