४ नोव्हेंबर
संजय जाधवचा नवा सिनेमा खारी बिस्कीट ह्या सिनेमाचा मूळ गाभा आणि विषय भावनिक असला तरी भावनांचा अतिरेक न करता पटकथेची मर्यादा सांभाळून सिनेमा आखला आहे. काही ठिकाणी पटकथा दिग्दर्शकाच्या पकडीतून निसटलेली जाणवते, परंतु तरीही सिनेमा आपला परिणाम साधण्यास यशस्वी ठरतो. सचिन मोटे यांनी पटकथा उत्तम रितीने बांधण्याचा प्रयत्न केला आहे. आठ वर्षांपूर्वी भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपच्या भावविश्वातील ‘नजरे’आडची गोष्ट ‘खारी बिस्कीट’च्या निमित्ताने सांगितली आहे.
चित्रपटाच्या नावाप्रमाणे ही गोष्ट आहे ती खारी (वेदश्री खाडिलकर) आणि बिस्कीट (आदर्श कदम) या भावा-बहिणीची. मुंबईत रस्त्याच्या शेजारील गरीब वस्तीत त्यांचे झोपडी आहे. आई-वडिलांचे नसलेल्या या छोट्या भावंडांच्या डोक्यावर आहे ते केवळ मोकळे आभाळ. त्यांची आई खारी-बिस्कीट विकायची म्हणून या मुलांचे नाव देखील ‘खारी’ आणि ‘बिस्कीट’ असेच आहे. खारीला दिसत नाही. ती जन्मापासून आंधळी आहे. परंतु खारीचे पूर्ण भावविश्व आणि ‘नजर’ आहे तो तिचा मोठा भाऊ बिस्कीट. ‘खारी आपली राजकुमारी आहे…’ या बिस्कीटच्या तोंडी असलेल्या वाक्याला साजेशी काळजी तो खारीची घेत असतो. आजुबाजूला काय सुरु आहे हे सर्व तो तिला सांगत असतो. अगदी पतंग उडवण्यापासून ते सिनेमा बघण्यापर्यंत खारीला जे हवे आहे ते बिस्कीट सर्व करतो. अगदी शाहरुख आणि सलमान खानला भेटण्याची खारीची इच्छा तो अनोख्या ढंगात पूर्ण करतो. खारीच्या तोंडचा प्रत्येक शब्द झेलायला बिस्कीट सदैव तत्पर असतो. तो तिचे सगळे हट्ट पुरवतो. त्याला फक्त आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू बघायचे आहे. खारीला आता वर्ल्ड कप बघायचा आहे. बिस्कीट शक्कल लढवून वस्तीतल्या वस्तीतच वर्ल्ड कप उभा करतो. पण, खारीच्या ‘नजरे’आड असलेला खोटा देखावा तिला समजतो आणि ती हिरमुसते. भाऊ आपल्याशी खोटं बोलल्याचे तिच्या लक्षात येते. इथून सिनेमाचे कथनाक वेग पकडते आणि बिस्कीट आपल्या बहिणीला खराखुरा वर्ल्डकप दाखण्याचे ठरवतो. खारीने वर्ल्डकप पाहिल्यावर भारत वर्ल्ड कप जिंकेल आणि सचिन तेंडुलकरचे स्वप्नदेखील पूर्ण होईल असा विश्वास त्याला असतो. कारण, खारीच्या तोंडून आलेली प्रत्येक बाब बिस्कीटला खरी ठरवायची असते.
खारी आणि बिस्कीट या दोन्ही भूमिका वेदश्री खाडिलकर आणि आदर्श कदम या दोन्ही बालकलाकारांनी आपल्या भूमिका उत्कृष्टरित्या साकारल्या असून आपल्या व्यक्तिरेखेतील बारकाव्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. वेदश्रीची काही दृश्यं लाजबाव झाली आहेत. लांबीने छोटी भूमिका असली तरी आईच्या भूमिकेत असलेली नंदिता धुरी हिने आपल्या अभिनयाने लक्ष वेधून घेते , आता बिस्कीट खारीला वानखेडे स्टेडियमला नेऊन खराखुरा वर्ल्ड कप कसा दाखवतो ? हे प्रत्यक्ष पडद्यावरच अनुभवायला हवे. खारीचे हट्ट पुरवण्यासाठी बिस्कीट काय काय करतो ? त्याला आपल्या मनाविरुद्ध अशा कोणत्या गोष्टी कराव्या लागतात ? या सगळ्याचे भावनिक चित्रण सिनेमात अत्यंत प्रभावीपणे केले आहे.
खारी बिस्कीट चित्रपट समीक्षा
RELATED ARTICLES