३० जानेवारी २०२०
कोरोना या जीवघेण्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमधून भारतात आयात केले जाणारे साहित्य आणि सूटे भाग (कंपोनेंट्स) यांच्यावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे भारतात उत्पादनात कपात आणि नव्या उत्पादनांच्या लाँचिंगमध्ये उशीर होणार असल्याचं स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी म्हटलंय इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
टेलिव्हिजन तयार करण्यासाठी वापरले जाणारे जवळपास 75 टक्के कंपोनेंट्स आणि स्मार्टफोन कव्हर्सचे 85 टक्के कंपोनेंट्स चीनमधून येतात बाजाराच्या सद्यस्थितीनुसार चिनी कंपन्यांनी कंपोनेंट्सच्या किंमतीत 2-3 टक्के वाढ केली आहे. चीनमध्ये नववर्षाची सुट्टी ३१ जानेवारीपर्यंत होती, पण आता तेथील सुट्टी ९ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिवाय यात अजून वाढ होऊ शकते. त्यामुळेही उत्पादनावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चीनमध्ये १३० हून अधिक जणांना मृत्यू झालाय. मध्य हुबेई प्रांतात एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, विषाणूची लागण झालेल्या निश्चित रुग्णांची संख्या आता सहा हजार झाली असून पुढील दहा दिवसांत चीनमधील परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून त्याने आता भारतातही शिरकाव केल्याची चिन्हे आहेत.