१६ मार्च २०२०,
पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये उतरलेल्या परदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरविल्या प्रकरणी एकाविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाची अफवा पसरविल्याबद्दल दाखल करण्यात आलेला हा पुण्यातील आणि राज्यातील पहिला गुन्हा आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांची खैर केली जाणार नाही, असा इशारा दिला होता. आपण स्वत: अफवा पसरविणाऱ्या एका व्यक्तिविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. ही तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली असून पोलिसांनी अफवा पसरविणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये उतरलेल्या परदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा त्याने सोशल मीडियावरून पसरविली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा मेसेज खोटा आणि खोडसाळ असल्याचं आढळून आलं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अफवा पसरविणाऱ्याचा शोध घेतला जात असून त्याला अटक करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम लक्षात घेता, या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून त्याच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीस होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, खडकी, देहूरोड व पुणे कटक मंडळ तसेच शहर हद्दीलगतच्या गावांमधील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था तसेच जिल्हयातील सर्व शॉपींग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापनामध्ये अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.