१२ फेब्रुवारी २०२०
कान्हे व लोणावळा मावळ येथे लवकरच अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयासाठी हिरवा कंदील दाखविला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.
मावळ तालुका औद्योगिकदृष्ट्या व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य नागरिकांना हवी तशी आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची परवड होत असुन शासकीय आरोग्यसेवा प्रभावीपणे मिळणे गरजेचे आहे. उपजिल्हा रुग्णालय आजवर उभे राहणे गरजेचे होते. मात्र तसे झालेले नाही. उपजिल्हा रुग्णालये उभी राहिल्यास सर्व गंभीर आजारावर उपचार, शस्त्रक्रिया होऊ शकतील. ही रुग्णालये जेव्हा उभी राहतील तेव्हा खऱ्या अर्थाने मावळ तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळणार आहे.
तालुक्यात शहरीकरणाबरोबरच MIDC भागातील कामगारांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग, पुणे- मुंबई महामार्गावर रहदारी वाढली आहे. यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सर्वसामान्यांना तातडीने योग्य उपचार मिळावे म्हणून या ठिकाणी अद्ययावत रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. तालुक्याची ही गरज ओळखून आ. शेळके यांनी मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. रुग्णालयाच्या कामासाठी आरोग्यमंत्री सकारात्मक असून हे काम लवकरात लवकर सुरु होईल. कान्हे व लोणावळा शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रुग्णालयाच्या कामाचा आपण स्वतः पाठपुरावा करणार आहोत, असे आ. शेळके यांनी सांगितले.