४ डिसेंबर
राज्यातील घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा दर आता दीडशे रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. चांगला कांदा काही ठिकाणी किलोमागे दीडशे रुपयांहून अधिक दराने विकला जात असून, घाऊक बाजारात ७० ते ९० रुपये किलोने मिळणारा ओला कांदा किरकोळ बाजारात शंभर रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याची दरवाढ आणखी पंधरा दिवस राहण्याची शक्यता आहे. बाजारात उन्हाळी कांदा संपल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
यंदा पाऊस लांबल्याने कांदा शेतात सडला. आणीबाणीच्या काळात वापरता यावा, यासाठी उत्पादक चाळीतील उन्हाळी कांदा बाजारात पाठवत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारातील जुन्या कांद्याला प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दर मिळत आहे.
तुटवडा भरून निघावा यासाठी केंद्र सरकारने पुन्हा तुर्कस्तानमधून १२ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा अद्याप आलेला नाही. त्यासाठी आणखी दहा ते बारा दिवस लागणार आहेत. याच काळात राज्यातील कांदा घाऊक बाजारात विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात मंगळवारी (३ डिसेंबर ) जुना आणि नवीन कांद्याच्या एकूण तीस ते चाळीस गाडय़ांची आवक झाली. नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाला असली तरी कांद्याची प्रतवारी तितकीशी चांगली नाही. मात्र, कांद्याची एकूण आवक अपुरी पडत असल्याने नवीन कांद्याचे दर तेजीत असल्याची माहिती मार्केट यार्डातील कांदा व्यापारी गणेश यादव यांनी दिली.