११ मार्च २०२०
महाराष्ट्रातही करोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने त्याचा सर्वांनीच धसका घेतला आहे. औरंगाबादच्या महापौरांनी महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. महापौर नंदकुमार घोडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे.
करोना व्हायरसची भीती लक्षात घेता महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी. ही निवडणूक पुढे ढकलताना पालिकेवर प्रशासक नेमू नये. विद्यमान नगरसेवकांनाच सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडले यांनी केली आहे.
नाशिक आणि पुणे येथे करोना व्हायरसचे रुग्ण सापडले असताना दोन्ही शहरापासून औरंगाबाद जवळ आहे. जगभरातील पन्नासहून अधिक देशातील नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. औरंगाबादमध्ये या देशातूनही पर्यटक येण्याची शक्यता आहे. महापालिका करोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असली तरी करोनामुळे भीतीचं वातावरण असल्याने एप्रिल महिन्यात होणारी पालिकेची निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी घोडले यांनी केली आहे. घोडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोगाकडेही ही मागणी केली आहे.
गर्दीच्या ठिकाणी करोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता अधिक असते. पालिका निवडणूक प्रचाराच्यावेळी, सभा आणि रॅलीदरम्यान गर्दी होण्याची शक्यता असल्याने करोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेही सहा महिने पालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होत आहे.