९ नोव्हेंबर
सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणात दिलेला ऐतिहासिक निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव असा होत नाही. आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेने दिलेला हा निकाल आहे. निकालानंतर पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी. तसेच नागरिकांनी पोलिसांनाही सहकार्य करावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. आपल्या देशाने सर्वधर्मसमभाव हे तत्त्व स्वीकारलेले आहे. आपल्या देशाची घटना या तत्त्वानुसारच तयार झालेली आहे. त्यामुळे अयोध्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव ठरत नाही. या निकालानंतर शहरातील सर्व नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम ठेवावी.
सोशल मीडियातून कोणतीही टीका-टिप्पणी करणे टाळावे. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करु नका. कोणतेही जुने व्हिडीओ, फोटो पोस्ट करणे किंवा अफवा पसरवून धार्मिक तेढ निर्माण करणारे कृत्य शहरातील नागरिकांनी करू नये. पोलिसांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.”