३ डिसेंबर
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आवाजी मतदानाने सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी विधेयक) मंजूर करण्यात आले. यावेळी काँग्रेसने सभात्याग करत विधेयकाबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली. हे विधेयक मंजूर झाल्याने आता केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे. माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नाही.
लोकसभेत सुरक्षा सुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेतही मांडण्यात आले. यावेळी या विधेयकावर वादळी चर्चा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केली. हे विधेयक केवळ एका कुटुंबाच्या हितासाठी आणण्यात आलेले नाही, असं शहा म्हणाले. गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षा का हटवण्यात आली असा सवाल काँग्रेसने केला होता. त्यालाही शहा यांनी उत्तर दिलं. गांधी कुटुंबीयांची सुरक्षा हटवण्यात आलेली नाही, तर ती बदलण्यात आली आहे. एसपीजी सुरक्षा ही एखाद्या कुटुंबासाठी असू शकत नाही. एसपीजी सुरक्षा म्हणजे स्टेट्स सिम्बॉल नाही, असं सांगतानाच केरळमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येवरून शहा यांनी डाव्या पक्षांवरही टीका केली.