२८ नोव्हेंबर
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासह मित्र पक्षांच्या 166 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देऊन महाआघाडीने सरकार स्थापनेसाठी मंगळवारी दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरे गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. दरम्यान, सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देताना राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना घटनेतील तरतुदीची जाणीव करून दिली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असते तरी ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार त्यांना पुढच्या सहा महिन्यांत विधिमंडळाचे सदस्य व्हावं लागेल असं राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या आमंत्रणाच्या पत्रात नमूद केलं आहे.
निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या यादीत उद्धव ठाकरेंचे नाव नाही. विधान परिषदेचे सदस्यत्वही त्यांच्याकडे नाही. घटनेतील तरतुदीनुसार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधिमंडळाच्या दोनपैकी एका सभागृहाचे सदस्य व्हावं लागेल असं राज्यपाल कोश्यारी यांनी पत्रात म्हटलं आहे.