१७ फेब्रुवारी २०२०
‘मुलगा-मुलगीबाबत इंदुरीकर महाराजांनी केलेलं वक्तव्य चुकीचं होतं. ते त्यांनी करायला नको होतं. मी त्याचं समर्थन करत नाही. पण ते लोकांचं प्रबोधन करतात. एका चुकीमुळं ते वाईट ठरत नाहीत,’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंदुरीकर महाराजांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे.
सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकरांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चहूकडून चौफेर टीका होत आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळं वैतागलेल्या इंदुरीकरांनी नुकतेच कीर्तन सोडून शेती करण्याचे संकेत दिले असताना त्यांच्या या पवित्र्यामुळं चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून इंदुरीकरांच्या समर्थनाची मोहीम सुरू झाली आहे.
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत ‘इंदुरकरांची दिवसाला ८० प्रवचनं होतात. ती सगळी जनप्रबोधनाची असतात. ते स्वच्छतेवर बोलतात. पाणी बचतीवर बोलतात. मी स्वत: त्यांना ऐकलं आहे. इंदुरीकरांच्या पाच मिनिटांच्या कीर्तनसाठी गेलो आणि तासभर बसलो, असंही माझ्या बाबतीत झालं आहे. इतकं त्याचं प्रवचन ऐकण्यासारखं असतं. एका चुकीमुळं हे सगळं वाया जात नाही,’ असं पाटील म्हणाले. ‘मीडियानंही त्यांच्याबद्दल जपून बातम्या द्याव्यात. एखाद्याची तपश्चर्या अशी एका क्षणात वाया घालवू नये,’ असं आवाहनही त्यांनी केलं.