२५ नोव्हेंबर,
‘मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही आम्ही आलो आहोत ‘ आमचा अडसर मोकळा करा. वाटेतून बाजूला झाला नाहीत तर तुमचं काय करायचं ते आम्हाला सांगायची गरज नाही. जो काही फोडाफोडीचा केविलवाणा प्रयत्न केला तो आणखी करा म्हणजे आम्ही आणखी एकजूट होऊ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये आम्ही १६२ हा नारा देऊन महाविकास आघाडीचे सगळे नेते एकाच छताखाली आले. तिथे आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी भाजपावर कडाडून निशाणा साधला.
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर भाजपकडून दगाफटका होण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्व आमदारांचं जोरदार शक्तीप्रर्दशन केलं. हॉटेल ग्रँड हयातमध्ये तिन्ही पक्षाच्या १६२ आमदारांची परेड करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदार एकत्र एकवटले होते. त्यामुळे हॉटेल ग्रँड हयातमध्ये मिनी विधानसभाच भरल्याचं चित्रं दिसत होतं. आज या तिन्ही पक्षांनी केलेली आमदारांची ही परेड हा राज्यपालांवरील दबावतंत्राचा एक भाग असल्याचं सांगण्यात येतं.
हे गोवा नाही महाराष्ट्र आहे – शरद पवार
शरद पवार यांनी यावेळी कुठल्याही आमदारावर कारवाई होणार नाही, पद जाणार नाही याची जबाबदारी घेतो असा विश्वास यावेळी दिला आहे. “सुप्रीम कोर्टाचा जो आदेश येईल तो पूर्णपणे पाळण्याची आपली तयारी आहे, अजित पवार यांचं वागणं पक्षाच्या विरोधात आहे, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.नव्या सदस्यांमध्ये व्हिपच्या मुद्द्यावरून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, अजित पवार यांना कुठलाही आदेश काढण्याचा अधिकार नाही. आम्ही वेगवेगळ्या लोकांची याबाबत मतं घेतली, त्यानुसार पक्षातून काढलेल्यांना अशा प्रकारचे अधिकार नाही. कुणावरही कारवाई होणार नाही याची मी स्वतः जबाबदारी घेतो,” असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना एकत्र आणत मुंबईतल्या ग्रँट हयात हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन केलं.
162 आमदार आमच्या ताब्यात असल्याचा दावा तिन्ही पक्षांनी केला आहे. या आमदारांना एकजूट राहण्याची शपथ देण्यात आली.ज्या हॉलमध्ये ही शपथ दिली गेली तिथं सर्वत्र ‘आम्ही 162’ असे बोर्ड लावले होते. शिवाय तिथं भारतीय संविधानची एक प्रतिकृती सुद्धा उभारण्यात आली होती.