११ फेब्रुवारी २०२०
रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावला आहे. रोहित पवार यांच्या आमदारकीविरोधात माजी मंत्री राम शिंदे आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलेत. आमदार रोहित पवार यांच्याविरोधात राम शिंदे यांनी ’इलेक्शन पिटिशन’ म्हणजेच ’निवडणूक याचिका’ मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीये. यामध्ये राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. निवडणूक अटी आणि शर्थींचा भंग केल्याचे हे सर्व आरोप आहेत. ’इलेक्शन पिटिशन’मध्ये साखर कारखान्यातील शंभर कर्मचार्यांचा निवडणूक काळात वापर करणे, या कर्मचार्यांच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटप करणे, व्हॉटस् अप मेसेजेसचा वापर करून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्रभावित करणे, निवडणुकांच्या काळात ’करप्ट प्रॅक्टिस’ करणे आदी आरोप करण्यात आले आहेत. अॅड. तळेकर यांनी माजी मंत्री राम शिंदे यांची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे.
राम शिंदे यांचे वकील तळेकरांनी युक्तिवाद करताना, निवडणूक काळात काही कर्मचारी, कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगे हात पकडलं होतं, त्या-त्या वेळेस निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकार्यांच्या हवाली देखील केलेलं, असं सांगितलंत. दरम्यान, याप्रकरणी आता आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने 13 मार्चपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे. आता आमदार रोहित पवार यांनी आपली बाजू मांडल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.