११ नोव्हेंबर
प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देणार्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद हा सण रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. या दिवसानिमित्त पिंपरी शहरात झेंडा मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर खाऊवाटपासह अन्य सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या मिरवणूकीत पिंपरीचे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही सहभाग नोंदवून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांकडून पैगंबर मोहम्मद यांच्या प्रतिकात्मक पावलांची पूजा करण्यात आली.
ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. या दिवशी अन्नाच्या स्वरुपात दान केले जाते. इस्लाम धर्मानुसार, पैगंबर हजरत मोहम्मद हे शेवटचे संदेशवाहक आणि सर्वात महान संदेष्टे मानले जातात. ज्यांना खुद्द अल्लाहने देवदूत जिब्रईलद्वारा कुराणचा संदेश दिला होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांनी नेहमी शांततेचा संदेश दिला. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. रविवारी संपूर्ण देशभरात ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ हा मुस्लिम बांधवाचा सण उत्साहात साजरा झाला. हा सण मुस्लिम बांधवांच्या अनेक मोठ्या सणांपैकी एक मानला जातो. मुस्लिम बांधव पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आनंद म्हणून हा सण साजरा करतात. 12 रबी उल अव्वल या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का येथे मोहम्मद यांचा जन्म झाला होता. हा दिवस पिंपरी-चिंचवड शहरात मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद मिलाद उन नबीच्या रूपात साजरा केला.
सकाळी आणि सायंकाळी नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव मशिदीत अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. या दिवशी पैगंबराच्या मोठमोठ्या मिरवणुकाही काढल्या. मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह तसेत आनंद पहायला मिळाला.