१ फेब्रुवारी २०२०,
जर तुमच्याजवळ आधार क्रमांक असेल तर बँकिंग व्यवहारांसाठी महत्वाचे असणारे पॅन कार्ड आता तुम्हाला त्वरीत मिळू शकणार आहे. यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज पडणार नाही. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्पादरम्यान घोषणा केली.
सीतारामन म्हणाल्या, करदात्यांच्या आधार क्रमांकावर आधारित व्हेरिफिकेशनची सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी करदात्यांच्या सुविधेसाठी लवकरच एक नवी यंत्रणा निर्माण केली जाईल. याद्वारे आधारच्या सहाय्याने ऑनलाईन पॅन कार्डची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही.
प्राप्तिकर कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आपल्या आधार क्रमांकाचा उल्लेख करणे गरजेचे आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२० पर्यंत पॅन आणि आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक आहे. प्राप्तिकर विभागाकडून एनएसडीएल आणि युटीआय-आयटीएसएल या दोन एजन्सीजच्या माध्यमातून पॅन कार्ड वितरित केले जातात.
इन्कम टॅक्स फाईलिंगशिवाय बँक अकाऊंट उघडणे आणि आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे.