२५ नोव्हेबंर
पिंपरी-चिंचवड शहराला होणारा पाणी पुरवठा आज पासून दिवसाआड करण्यात येत आहे. प्रतिकूल परिस्थितीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. त्याला नगरसेवक, सामाजिक स्तरातून प्रचंड विरोध होत आहे. तरी,सत्ताधारी भाजपाचा मात्र ह्या निर्णयाला पाठिंबा असून हा निर्णय आजपासून लागू करण्याचे आदेश आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत.
यंदा मुबलक पावसाळा झाल्याने पवना धरणात जवळपास शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराला पुरेल एवढे पाणी उपलब्ध असताना कपातीचा निर्णय आयुक्त हर्डीकर यांनी घेतला आहे. पूर्णवेळ पाणी पुरवठा होत असताना देखील शहराच्या काही भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याची खंत आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. अशी परिस्थिती असताना आयुक्तांनी दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आजपासून लागू होणार होत असून, नागरिकांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.