भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी दुपारी बारा वाजता दिल्लीत निधन झालं. ते 66 वर्षांचे होते.
पेशाने वकील असणाऱ्या जेटली यांनी भाजप सत्तेत असताना केंद्रीय मंत्री म्हणून अनेक जबाबदाऱ्या हाताळल्या. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा घेतलेला सविस्तर आढावा.
25 जून 1975. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अरुण जेटली नारायणामधल्या त्यांच्या घराच्या अंगणात झोपले होते.
बाहेरच्या आवाजानं त्यांना जाग आली. पाहिलं तर त्यांचे वडील काही पोलिसांसोबत वाद घालत होते. हे पोलीस त्यांना अटक करायला आले होते.
हे पाहून अरुण त्यांच्या घराच्या मागच्या दरवाज्याने बाहेर पडले. त्याच गल्लीतल्या मित्राच्या घरी त्यांनी ती रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जवळपास 200 विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठाच्या व्हाईस चॅन्सलरच्या ऑफिसबाहेर गोळा केलं.