५ नोव्हेंबर
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आयोध्या येथील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी मंगळवार पासून (५ नोव्हेंबर) राज्यातील सर्व पोलिसांच्या सुट्टया, रजा रद्द करण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर नागरिकांनी सोशल मीडियात कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी पुणे येथे बैठक झाली.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर या निकालावर चांगल्या अथवा वाईट असा कोणत्याही स्वरुपाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात टाकू नयेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियातून टीकाटिपणी, पत्रकबाजी करणे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारी ठरू शकते. यामुळे सोशल मिडियातून प्रतिक्रिया देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
येणाऱ्या काही दिवसांमध्ये रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर माननीय सर्वोच्च न्यायालय यांचेकडून पुढील काही दिवसात निकाल अपेक्षित आहेत. हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे. त्याच्यावर सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे.तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकाने पाळणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
आयोध्या येथील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी पोलिसांनी काही सूचना केल्या असून या सूचनांचे पालन करावे असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या सूचना खालीलप्रमाणे
* जमाव करून थांबू नये.
* सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.
* निकालानंतर गुलाल उधळू नये.
* फटाके वाजवू नयेत.
* सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत.
* महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये.
* निकालानिमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत
* घोषणाबाजी जल्लोष करू नये.
* मिरवणुका रॅली काढू नये.
* भाषण बाजी करू नये.
* कोणतेही वाद्य वाजवू नये.
* धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये.
* कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ, फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये.
उल्लंघन केल्यास शिक्षा
सदरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला केवळ जागेसंदर्भातील निकाल असेल. तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्याचेवर भारतीय दंड सहितेनुसार कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यामध्ये कलम २९५, कलम २९५ (अ), कलम २९८ बरोबरच इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून मा. न्यायालयात समक्ष हजर करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे व सायबर सेलचे लक्ष्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
RELATED ARTICLES