२५ नोव्हेंबर
भाजपाशी सलोखा करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट देण्यात आल्याचं वृत्त सीएनएन न्यूज १८ ने दिलं आहे. अजित पवार आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना झालेल्या सिंचन घोटाळ्यावरून ते तपास यंत्रणांच्या रडारवर होते. लाचलुचपत विभाग, सक्तवसुली संचालनालय यांच्याकडून सिंचन घोटाळ्याचा तपास सुरु होता. देवेंद्र फडणवीस हे २०१२ मध्ये विधानसभेत विरोधी बाकावर असताना कायम अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करीत होते. मात्र आता अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
दरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्याने आज काही केसेस बंद करण्यात आल्या असून जर त्यामध्ये अजून काही माहिती समोर आली किंवा न्यायालयाने आदेश दिला तर पुन्हा सुरु करण्यात येतील असं सांगितलं आहे. “सिंचन घोटाळ्याशी संबंधित तीन हजार कंत्राटांचा आम्ही तपास करत आहोत. ज्यांची चौकशी बंद करण्यात आली आहे त्या नियमित केसेस असून, इतर तपास नेहमीप्रमाणे सुरु आहे,” असं एसीबीचे डीजी परमबीर सिंह यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे. काँग्रेसने मात्र अजित पवारांना दिलासा देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला आहे.